रायगडात साक्षरतेचा ‘उल्लास’, तीन हजार निरक्षरांनी गिरवले साक्षरतेचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यात तीन हजार निरक्षरांनी साक्षरतेचे धडे गिरवले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षा घेतली. यामध्ये जिल्ह्यातील 1 हजार 773 परीक्षा केंद्रावर 3 हजार 68 नवसाक्षरांनी सहभाग नोंदवत साक्षरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील निरक्षरांनी या मोहिमेत भाग घेतला.

रायगड जिल्ह्यातील परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे महिला परीक्षार्थींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. 150 गुणांच्या या चाचणीत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन विषयांसाठी प्रत्येकी 50 गुण निश्चित करण्यात आले असून उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 17 गुण मिळवणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यात साक्षरतेचा पाया अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परीक्षेसाठी नोंदणीकृत 3 हजार 68 नवसाक्षरांपैकी 2 हजार 508 महिला आणि 560 पुरुषांनी परीक्षा दिली. आयुष्याच्या उत्तरार्धातही शिक्षणाची ओढ कायम ठेवत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी परीक्षेत सहभाग घेतला.

“उल्लास” साक्षरता परीक्षेसाठी जिल्हा शिक्षण विभागाने परीक्षेचे काटेकोर नियोजन केले होते. शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्वयंसेवकांनी गावागावात सर्वेक्षण करून निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. – महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)