
मुंबईकरांना आरामदायी प्रवासाचे स्वप्न दाखवून प्रवासी सेवेत दाखल झालेल्या भुयारी मेट्रो मार्गिकेवर मोबाईल नेटवर्कचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंतच्या मार्गिकेवर आता मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. नेटवर्कसाठी पंत्राटदार नियुक्तीचा घोळ कायम असल्यामुळे नियमित प्रवासी मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
मेट्रो-3 मार्गिकेच्या आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला संकुल आणि तेथून पुढे आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंतच्या दोन टप्प्यांत शुक्रवारपर्यंत बीएसएनएल आणि व्होडाफोनचे मोबाईल नेटवर्क होते. बीएसएनएलपाठोपाठ व्होडापह्नचेही नेटवर्क बंद झाल्यामुळे संपूर्ण मार्गिका आता मोबाईल नेटवर्कबाहेर गेली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी परदेशी पंपनीशी केलेले पंत्राट रद्द केले आणि नव्या पंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी नुकतीच निविदा जारी केली आहे. मात्र नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना मोबाईल नेटवर्कशिवाय भुयारी मेट्रोचा प्रवास करावा लागणार आहे. ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल होऊन सहा महिने झाले. त्यानंतरही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सोडवण्यात एमएमआरसीला यश आलेले नाही. त्यामुळे नियमित प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
प्रवासी संख्या घटण्याची चिन्हे
भुयारी मेट्रो मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला. मात्र तिकीट दर जास्त असल्यामुळे पुढील काळात प्रवासी संख्या अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. ऑक्टोबर 2025 मध्ये 38 लाखांहून अधिक प्रवाशांनी भुयारी मेट्रो मार्गिकेचा वापर केला होता. मात्र तीन महिन्यांत एकूण प्रवासी संख्या केवळ 46.56 लाखांवर पोहोचली. आता मोबाईल नेटवर्कचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने भुयारी मेट्रोची प्रवासी संख्या घटण्याची शक्यता वाहतूकतज्ञांकडून वर्तवली जात आहे.



























































