नुकत्याच झालेल्या लोकसभेचे #ElectionResults जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वबळावर भाजपला सत्ता मिळवून देऊ शकले नाहीत. त्याऐवजी NDA च्या आधारावर पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याची संधी आली आहे. 543 जागांच्या लोकसभेत एकट्या भाजपला 241 जागांवर समाधान मानावं लागलं असून NDA म्हणून आता ते शपथ घेणार आहेत.
परदेशी मीडियाने हिंदुस्थानातील निवडणूक निकालांचे कव्हर कसे केले ते येथे आहे:
दि न्यूयॉर्क टाईम्स
न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी त्यांच्या पहिल्या पानावर “Modi’s party wins, but it’s far from a landslide” या मथळ्यासह एक बातमी दिली. ‘मंगळवारी जाहीर झालेले निकाल अनपेक्षितपणे भाजपच्या चिंता वाढवणारे होते’, असे यूएस मीडिया आउटलेटने लिहिले.
बहुमताचं सरकार आणण्यास भाजप अपयशी ठरलं असून भाजपनं डझनभर जागा गमावल्या आणि आता सत्तेत राहण्यासाठी युतीच्या सहकाऱ्यांवर त्यांना अवलंबून राहावं लागेल. तसंच त्यांनी अधोरेखित केलं आहे की, भाजपसोबत असलेले सहकारी यू टर्न घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
द टाइम्स, लंडन
द टाइम्सनं वृत्त दिलं आहे की देशात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागेल.
देशातील मतदारांनी भाजपला बहुमतात येण्यापासून रोखलं, लंडन-मधील आउटलेटनं लिहिलं की सर्वसामान्य जनतेनं नेमकं कसं मतदान केलं याबद्दलचा कोणताही डेटा त्यांच्याकडे नाही.
ग्लोबल न्यूज, कॅनडा
भाजपनं अपेक्षेपेक्षा अधिक जागा गमावल्या, कॅनडा-आधारित ग्लोबल न्यूजने रिपोर्ट दिला की, 2014 नंतर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष स्वबळावर बहुमत मिळवण्यास अपयशी ठरला आहे. रिपोर्टमध्ये “आश्चर्यकारक धक्का” म्हटलं आहे आणि भाजप आता ‘आपल्या मित्रपक्षांच्या सहकार्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल’ असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
डेली स्टार, बांगलादेश
तिसऱ्या टर्ममध्ये, भाजपला मागील दोन निवडणुकांपेक्षा त्याच्या मित्रपक्षांना चांगली खाते द्यावे लागतील, असं वृत्त ‘द डेली स्टार’नं दिलं आहे. त्यात असंही नमूद करण्यात आलं आहे की पीएम मोदींनी एनडीएसाठी 400 हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवलं होतं. पण त्यांना 241 जागांवरच समाधान मानावं लागलं.
ग्लोबल टाइम्स, चीन
चीन-मधील ग्लोबल टाईम्सनं वृत्त दिलं आहे की पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत विजयाचा दावा केला असताना, त्यांच्या नेतृत्वाखालील NDA नं काठावरचं बहुमत मिळवलं आहे. भाजपला पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आलं पण युतीला बहुमताचा आकडा गाठता आला, असं त्यात म्हटलं आहे. मतमोजणीमुळे आर्थिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली, ज्यानं पंतप्रधान मोदींना मोठा विजय मिळण्याची अपेक्षा केली होती, असंही त्यात नमूद केलं आहे.