
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प देशासमोरील मुख्य आर्थिक संकटांवर उपाय शोधण्यात अपयशी ठरला असून त्याने धोरणात्मक सुधारणांनाही नाकारले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “देशासमोर सध्या बेरोजगारी, कृषी संकट आणि वाढती महागाई ही मुख्य आव्हाने आहेत. मात्र, या अर्थसंकल्पात तरुणांसाठी नोकऱ्यांचा अभाव, उत्पादन क्षेत्रातील घसरण आणि संकटात सापडलेला शेतकरी यांच्यासाठी काहीही ठोस नाही.” सुधारणांना नकार देणारा अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Youth without jobs.
Falling manufacturing.
Investors pulling out capital.
Household savings plummeting.
Farmers in distress.
Looming global shocks – all ignored.A Budget that refuses course correction, blind to India’s real crises.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही दम नाही – जयराम रमेश
केंद्रीय अर्थसंकल्पावर आपलॆ प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले आहेत की, “केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही दम नाही. X वर एक पोस्ट करत जयराम रमेश म्हणाले की, अर्थसंकल्पीय दस्तऐवजांचा सविस्तर अभ्यास करणे अजून बाकी असले तरी, निर्मला सीतारामन यांच्या ९० मिनिटांच्या भाषणानंतर हे स्पष्ट झाले आहे की, या अर्थसंकल्पाबाबत जे मोठे वलय निर्माण करण्यात आले होते, त्या तुलनेत यात काहीही विशेष नाही. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि पारदर्शकतेचा अभाव असलेला आहे.























































