राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी, केंद्रीय मंत्री बरळले; काँग्रेसचा पलटवार

लोकसभा निवडणुकीतील खराब ‘स्ट्राईक रेट’मुळे सैरभैर झालेला भारतीय जनता पक्ष सातत्याने काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टार्गेट करत असून रविवारी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनीही एक वादग्रस्त विधान केले. राहुल गांधी हे देशातील नंबर एकचे दहशतवादी आहे, असे ते बरळले. यावर काँग्रेसनेही पलटवार केला असून रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर हल्ला लढवला आहे.

राहुल गांधी हे हिंदुस्थानी नाहीत. ते बहुतांश वेळ विदेशात घालवतात. त्यांचे देशावर प्रेम नाही, कारण ते बाहेर जाऊ देशाबाबत चुकीची विधानं करतात, असा आरोप रवनीत सिंग बिट्टू यांनी केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी रवनीत सिंग बिट्टू यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. अशा लोकांची मला फार दया येते. काँग्रेसमधील त्यांची राजकीय कारकीर्दही गोंधळात टाकणारी होती. ते आधी राहुल गांधी यांची स्तुती करत असत आणि आता राजीनामा देऊ भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून ते पक्षनिष्ठा दाखवत आहेत, असे संदीप दीक्षित एएनआयशी बोलताना म्हणाले.