
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्याने केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण संचालनालयाने कफ सिरपच्या वापरासंबंधी आणि औषधांच्या डोसमध्ये खबरदारी घेण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात सर्व रुग्णालयांना दोन वर्षांखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधे देऊ नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाच वर्षांखालील मुलांना देखील सामान्यपणे अशी औषधे सुचवू नयेत, असेही सांगण्यात आले आहे.
मार्गदर्शक सूचनेनुसार, बालरोगांच्या उपचारामध्ये दोन वर्षांखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधे लिहून देऊ नयेत किंवा वितरित करू नयेत. साधारणपणे पाच वर्षांखालील मुलांसाठीही ही औषधे शिफारस केली जात नाहीत. मुलाला खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रोटोकॉलचे पालन करावे. रुग्णालयांनी केंद्र सरकारने 3 ऑक्टोबरला जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
तसेच आरोग्यसेवा केंद्रांचे ऑडिट केले जावे. योग्य व्यक्ती, योग्य औषध, योग्य डोस, योग्य मार्ग आणि योग्य वेळ यांचे पालन सुनिश्चित करावे. सर्व आरोग्यसेवा कर्मचारी कोणत्याही प्रकरणाबद्दल किंवा असामान्य मृत्यूबद्दल वेळेवर अहवाल देतील, याची खात्री करावी.
दरम्यान, दिल्ली सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने सर्व संबंधितांना कोल्ड्रिफ सिरपच्या खरेदी, विक्री आणि वितरणामध्ये तात्काळ प्रभावाने सहभागी न होण्याबाबत कार्यालयीन आदेश जारी केला आहे. तसेच सामान्य लोकांना कफ सिरपचे सेवन टाळावे याबाबत जागरूक करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.