सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्याचे विनापरवाना उद्घाटन, गोगावलेंची चौकशी होणार; शिवसेनेच्या दणक्याने प्रशासन हलले

कोणतीही शासकीय परवानगी नसताना सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याचे स्वयंघोषित उद्घाटन करणारे मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची आता चौकशी होणार आहे. भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केल्यानंतर प्रशासन हलले आणि या विनापरवानगी गाळ काढण्याच्या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असे आदेशच महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी रायगड पाटबंधारे कोलाड विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

मंत्री असल्याने मी करेन तीच पूर्वदिशा असा भरत गोगावले यांचा महाडमध्ये कारभार सुरू आहे. कोणतीही शासकीय परवानगी नसताना गोगावले यांनी महाडच्या सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन केले. याची गंभीर दखल शिवसेनेचे महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी घेतली. त्यांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करून गोगावलेंविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

या कार्यवाहीत चालढकल केली तर संबंधित मंत्री आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नावे नमूद करून सीआरपीसी कलम 156 (3) अन्वये न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा इशारा ओझर्डे यांनी दिला. त्यानंतर ओझर्डे यांनी महाड पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनाही पत्र लिहून गोगावले यांच्यासह सावित्रीतील गाळ काढणारे संबंधित कंत्राटदार, यंत्रचालक, मशीनमालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

काय कारवाई केली ते कळवा

ओझर्डे यांच्या या पवित्र्याने प्रशासनाची पळापळ झाली. महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी रायगड पाटबंधारे विभागाचे कोलाड कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले. ओझर्डे यांनी केलेल्या तक्रारीनुसार पाटबंधारे विभागाने नियमोचित कारवाई करावी, असे आदेशच उपविभागीय अधिकारी ओमासे यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. कोणती कारवाई केली ते ओझर्डे यांना तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाला कळवावे, असेही ओमासे यांनी पत्रात नमूद केले आहे.