अवकाळीने कोपरगावला झोडपले

कोपरगाव तालुक्याला बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसाने शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील जेऊर पाटोदा, मुर्शतपूरला सर्वाधिक नुकसान झाले. या पावसात शेतपिकांसह राहत्या घरांचेदेखील मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जेऊर पाटोदा व मुर्शीदपूर या पट्टय़ात बुधवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आला. वादळामुळे मुर्शतपूर मंडपी परिसरात असलेल्या मारुती मंदिरावरील पत्र्याचे शेड उडून गेले तर पाच कुटुंबांच्या घरांची पडझड झाली. घरकुलात राहत असलेल्या दोन कुटुंबांसह आणखीन तीन जणांच्या घरावरील पत्रे उडाले तसेच भिंती पडूनही नुकसान झाले. हिराबाई परसराम पवार, अन्सार मन्सूर पठाण, दादासाहेब काशिनाथ ढोले, आप्पासाहेब श्रावण सोनवणे, दिलीप चंद्रकांत गिरमे यांच्या घराचे पत्रे उडालेले आहेत. गावठाणात झाड पडून रूपाली शंकर बर्डे ही पाचवीत शिकणारी मुलगी जखमी झाली. आजच्या पावसाने कांदा, मका इत्यादी पिकांचे तसेच काढणीस आलेला कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.

जामखेडमधील शेतकऱयांना अद्याप भरपाई नाही

जामखेड – तालुक्यात ऑक्टोबर 2022मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे 23 हजार 656 शेतकऱयांची पिके बाधित झाल्याचे पंचनाम्यानंतर समोर आले होते. त्यानुसार तालुका प्रशासनाने 13 हजार 995 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईपोटी 22 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे 3 नोव्हेंबर रोजी केली होती. त्याला पाच महिने झाले तरी शेतकऱयांच्या खात्यात अजून दमडीही आली नाही. तालुक्याला दोन आमदार असूनही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याची खंत व्यक्त होत आहे.

महावितरणचे सव्वा कोटींचे नुकसान

नगर – मागील आठवडय़ात तीन दिवस झालेल्या वादळी वाऱयासह गारपिटीचा तडाखा महावितरणला बसला. त्यांचे सुमारे एक कोटी 12 लाखांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने नगर शहरासह नगर व पारनेर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने रोहित्र बंद पडले तर सब स्टेशनमध्ये बिघाड होऊन जिह्यातील 118 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नगर शहर, नगर तालुका, पारनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असले तरी श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहाता तालुक्यातील काही भागात कमी- अधिक नुकसान झाले आहे.