एकाच बँक खात्यातून दोघांचे यूपीआय पेमेंट

एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युपीआय अर्थात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून प्रायमरी अकाऊंट होल्डर सेकेंडरी यूजर्सला आर्थिक व्यवहार करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. युपीआय अकाऊंटचे सर्व अधिकार किंवा मास्टर अॅक्सेस अकाऊंट होल्डरकडे असतील परंतु दुसऱ्या कुणाला त्याच अकाऊंटमधून पेमेंट करायचे असेल तर प्रायमरी अकाऊंट होल्डर त्याला व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकतो. हे फीचर कुटुंबातील सदस्यांना कुठल्याही ठिकाणी पेमेंट करण्यासाठीचा अधिकार देण्याची एक नवीन पद्धत किंवा फीचर असल्याचे बँक ऑफ बडोदाच्या डिजिटल बँकिंग विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक के. वी. शीतल यांनी सांगितले. या फीचरच्या माध्यमातून एकाच बँक खात्यातून दोघांना आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.

असे काम करेल फीचर

प्रायमरी यूजर सेकेंडरी युजरला पूर्ण किंवा अंशिक व्यवहार करण्याचे अधिकार देऊ शकतो. पूर्ण अधिकार दिले तर सेकेंडरी युजरला प्रायमरी युजरकडून निश्चित केलेली रक्कम थेट देण्याचे अधिकार मिळतील. अंशिक अधिकारांमध्ये सेकंडरी यूजरला प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी प्रायमरी यूजरची परवानगी घ्यावी लागेल.

व्यवहाराची मर्यादा काय असेल?

प्रायमरी यूजर सेकेंडरी युजरसाठी आर्थिक व्यवहाराची मर्यादा निर्धारित करू शकतो. एनपीसीआयच्या नुसार आर्थिक व्यवहारांची जास्तीत जास्त मर्यादा 15 हजार रुपये असेल. दरम्यान, ज्या कुटुंबात केवळ एकाच सदस्याचे बँक खाते आहे त्यांच्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. हे फीचर सुरक्षित असेल. केवळ खातेधारकच आर्थिक व्यवहार पडताळून पाहू शकतो. आर्थिक व्यवहारांची मर्यादा निश्चित करू शकतो.