अमेरिकेत 20 हजार हिंदुस्थानी ट्रकचालकांचा परवाना रद्द, पोटापाण्यावर गदा; निर्णयाविरोधात न्यायालयात घेतली धाव

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील हजारो स्थलांतरित ट्रकचालकांचे व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स (सीडीएल) रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ट्रकचालकांना लढा द्यावा लागत आहे. या चालकांनी कॅलिफोर्नियाच्या मोटार वाहन विभागाविरुद्ध (डीएमव्ही) न्यायालयात धाव घेतली आहे. हा निर्णय आपल्या उदरनिर्वाहावर गदा आणणारा असून मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

नोव्हेंबरपर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त चालकांना परवाना रद्दच्या नोटिसा मिळाल्या होत्या. ही संख्या आता 21 हजारांच्या आसपास असल्याचे समजते. परवाना मुदत जास्त असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

  • ट्रकचालकांच्या मते हा सर्व प्रकार डीएमव्हीच्या कागदपत्रांमधील चुकांमुळे घडला आहे. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, अशी चूक झाल्यास मोटार वाहन विभागाने स्वतःहून परवान्यावरील तारीख दुरुस्त करणे अपेक्षित आहे किंवा चालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देणे गरजेचे आहे, मात्र तसे न करता राज्याने थेट परवाने रद्द करण्याचा मार्ग निवडला आहे.

न्यायालयाने हस्तक्षेप करावा

हजारो चालकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘द शीख कोलिशन’ आणि ‘एशियन लॉ कॉकस’ या संघटनांनी पाच ट्रकचालकांच्या वतीने याचिका दाखल केली आहे. त्यांनी अलामेडा काउंटी सुपीरियर कोर्टाला या परवाना रद्द करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.