अमेरिकेत जाण्याचे स्वप्न महागले, ट्रम्प सरकारने व्हिसा शुल्कात केली अतिरिक्त वाढ

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने व्हिसा नियमांत मोठय़ा बदलाची घोषणा केली आहे. नव्या बदलानुसार आता विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्स आणि पर्यटकांना अमेरिकेला जाणे महागणार आहे. कारण व्हिसा शुल्कासोबत इंटिग्रिटी शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क साधारण 21 हजार रुपये एवढे असेल. नवा नियम 2026 पासून लागू होईल. त्यामुळे अमेरिकेत जाऊन नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

ट्रम्प सरकार नवीन नियम ‘बिग बन ब्युटीफुल बिल’ अंतर्गत घेऊन येत आहे. याचा परिणाम दरवर्षी एच- 1बी व्हिसावर अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या लाखो हिंदुस्थानींवर याचा परिणाम होईल. याशिवाय विद्यार्थी, पर्यटक आणि व्यावसायिकांनाही फटका बसेल.

दरवर्षी हजारो आयटी प्रोफेशनल्स एच- 1 बी व्हिसावर अमेरिकेत जातात. त्यांनाही अतिरिक्त शुल्क लागू पडेल. हे एकप्रकारचे सिक्युरिटी डिपॉझिट  असेल. काही परिस्थितीत हे शुल्क परतही मिळू शकते. उदाहरणार्थ, अमेरिका सोडून गेल्यावर किंवा ग्रीन कार्ड मिळण्याआधी व्हिसाची मुदत संपलेली नसेल, तेव्हा अतिरिक्त शुल्क परत मिळू शकते. मात्र हे रिफंड आपोआप होणार नाही. त्यासाठी सबळ पुरावे आणि कागदपत्रे सादर करावी लागतील.

सध्या बी- 1/ बी-2 व्हिसासाठी 185 डॉलर म्हणजे साधारण  15800 रुपये भरावे लागतात. नवीन शुल्क जोडल्यानंतर 250 डॉलर द्यावे लागतील. हिंदुस्थानी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी एफ किंवा एम व्हिसावर जातात. त्यांनाही अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

दरवर्षी इंटिग्रिटी शुल्कात वाढ होईल. इमिग्रेशन कायद्याचे नीट पालन होण्यासाठी तसेच व्हिसा संपल्यावर काही लोक राहतात, त्यांना आळा घालण्यासाठी नवा नियम असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.