Iran Israel War – तातडीने बगदाद सोडा, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बगदादमध्ये येत्या काही तासांत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. बगदादमधील अमेरिकी दूतावासाने गुरुवारी एक अत्यंत महत्वाची सूचना जारी केली असून,इराणशी संबंधित इराकी दहशतवादी गट मध्य बगदादला लक्ष्य करू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे. दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून आपल्या नागरिकांना तातडीने इराक सोडण्याचे आदेश दिले आहेत.

दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इराणशी संबंधित इराकी दहशतवादी गट पुढील 24 ते 48 तासांत मध्य बगदादमध्ये हल्ल्यांचा कट रचत असल्याचा संशय आहे. हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो, कारण येथे अनेक देशांचे दूतावास आणि सरकारी इमारती आहेत. या संभाव्य आणि गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इराकमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ देश सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी दूतावासाने हा इशारा दिला असून सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता अमेरिका सध्या आपल्या नागरिक, राजनयिक अधिकारी आणि लष्करी तळांच्या सुरक्षेबाबत कमालीची सतर्क आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी बगदादमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. इराकी गृह मंत्रालयाने या अपहरणाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, गुप्त माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून अपहरणासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे, मात्र इतर आरोपी अद्याप फरार आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे इराकची सुरक्षा व्यवस्था सध्या हाय अलर्टवर आहे.