रशिया- युक्रेनमधील शांतता करार अंतिम टप्प्यात? अमेरिका-रशियाच्या राजदूतांमध्ये चर्चा

गाझामध्ये शांतता करार झाल्यानंतर आता अमेरिकेने रशिया युक्रेनमधील शांतता करार पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. अमेरिकेचे अध्यक्षीय राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवरून युक्रेनसोबत शांतता योजना पूर्णत्वास नेण्यासाठी एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी शांतता कराराचा मसुदा तयार करावा आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तो प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडावा, असे सुचवले. त्यामुळे या समस्येतून मार्ग निघेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

विटकॉफ यांनी पुतिन यांचे परराष्ट्र धोरणातील वरिष्ठ सहाय्यक युरी उशाकोव्ह यांना रशियाने शांतता करार ट्रम्प यांच्यासमोर हा मुद्दा कसा मांडावा याबद्दल सल्ला दिला. गाझा शांतता करारानुसार दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुतिन आणि ट्रम्प यांनी प्रस्तावावर चर्चा करावी, ती चर्चा कशी असावी, याबद्दल अमेरिकेने रशियाला सूचना केल्या आहेत.

अमेरिकेच्या राजदूताने रशियाला युक्रेनची योजना ट्रम्पसमोर कशी मांडावी याबद्दल सल्ला दिला. उशाकोव्ह यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, विटकॉफ यांनी त्यांच्या रशियन समकक्षांना सांगितले की त्यांना पुतिनबद्दल खूप आदर आहे आणि त्यांनी ट्रम्प यांना सांगितले होते की रशियाला नेहमीच शांतता करार हवा आहे असा त्यांचा विश्वास आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार शांततेसाठी ट्रम्प यांनी २०-कलमी योजना तयार केली आहे. रशियानेही शांततेसाठी प्रस्ताव तयार करावा, असे विटकॉफ यांनी उशाकोव्ह यांना सांगितले.

पुतिन यांनी या महिन्यात सांगितले की त्यांना विश्वास आहे की शांतता तोडग्यासाठी अमेरिकेची योजना आधार म्हणून वापरली जाऊ शकते. रशियन सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की २८ कलमी योजनेवर अमेरिकेसोबत अद्याप सविस्तर चर्चा झालेली नाही, परंतु मॉस्कोला त्याची प्रत मिळाली आहे.अमेरिकन राजदूताने झेलेन्स्कीच्या आगामी भेटीचा उल्लेख केला आणि त्या बैठकीपूर्वी पुतिन ट्रम्पशी बोलू शकतात असे सुचवले. त्यामुळे लवकरच रशिया- युक्रेनमध्ये शांतता करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.