US Fed Rate Cut – फेडकडून व्याजदरात कपात; सकारात्मक संकेत,हिंदुस्थानी बाजारात दबाव कायम

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदारात कपात केली आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सध्या हिंदुस्थानी बाजारावर दबाव कायम आहे. तसेच फेड रेट कट झाल्यास सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत होते. त्यामुळे फेडचे निकाल जाहीर होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

यूएस फेड रिझर्व्हने पुन्हा एकदा रेटकट केले आहेत. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी हा निर्णय जाहीर केला. फेडरल ओपन मार्केट कमिटीने (FOMC) बुधवारी २५ बेसिस पॉइंट किंवा ०.२५ बेसिस पॉइंटने पॉलिसी रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे तो ३.५% ते ३.७५% पर्यंत पोहोचला. ही सलग तिसरी दर कपात आहे, ज्यामुळे अमेरिकन व्याजदर तीन वर्षातील सर्वात कमी पातळीवर आले आहेत.

जेरोम पॉवेल यांनी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत स्पष्ट केले आहे की, अमेरिकन अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करून, येत्या काही महिन्यांत अमेरिकन फेड दरांमध्ये आणखी कपात करण्याची शक्यता नाही. तथापि, फेड अधिकाऱ्यांनी असेही सूचित केले आहे की पुढील वर्षी दर कपात अपेक्षित आहे. फेडरल रिझर्व्हने कमी केलेल्या व्याजदरांमुळे कालांतराने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डसाठी कर्ज घेण्याचा खर्च कमी होऊ शकतो. दोन दिवसांच्या फेड बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात, फेडच्या व्याजदर-निर्धारण समितीने सूचित केले की ते येत्या काही महिन्यांत व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने केलेली व्याजदर कपात हिंदुस्थानसारख्या बाजारपेठांसाठी सकारात्मक मानले जात आहेत. याआधी केलेल्या दर कपातीमुळे हिंदुस्थानी शेअर बाजारात अनेकदा वाढ झाली आहे. कमी अमेरिकन व्याजदरांमुळे अमेरिकन कर्जाचे आकर्षण कमी होईल आणि जागतिक गुंतवणूकदार इक्विटी आणि बाँड्ससारख्या अधिक परतावा देणाऱ्या पर्यायांकडे आकर्षित होतील. त्याचमुळे फेडचे निकाल जाहीर होताच सोन्या-चांदीच्या दरातही तेजी आली आहे.