
मध्य पूर्वेतील समुद्रात अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या एका विमानवाहू युद्धनौकेच्या दिशेने येणारा इराणचा एक ड्रोन अमेरिकन लढाऊ विमानाने पाडला आहे. दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र कराराबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ही घटना घडल्याने चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या विमानवाहू युद्धनौकेच्या दिशेने इराणचा एक ड्रोन वेगाने येत होता. स्वसंरक्षणार्थ अमेरिकेच्या F-35C या अत्याधुनिक फायटर जेटने हा ड्रोन पाडला.
एकाच दिवसात दोन घटना
मंगळवारी केवळ हीच एक घटना घडली नाही, तर यापूर्वीही दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष पाहायला मिळाला. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या सैन्याने अमेरिकेचा ध्वज असलेल्या ‘Stena Imperative’ या टँकरला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन विनाशिकेने (Destroyer) हवाई मदतीच्या जोडीने या टँकरची सुटका केली आणि त्याला सुरक्षित बाहेर काढले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान या दोघांनीही चर्चेची तयारी दर्शवली असली तरी परिस्थिती तणावपूर्ण आहे.
ट्रम्प यांनी इराणला लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे, तर पेझेश्कियान यांनी ‘धमकीमुक्त वातावरणातच चर्चा शक्य आहे’ असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘इराणवर विश्वास ठेवता येणार नाही’ असे म्हणत अमेरिकेला सावध केले आहे.
इराणमधील अंतर्गत अशांतता
इराणमध्ये महागाईविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनांनी आता उग्र रूप धारण केले आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, या आंदोलनांमधील दडपशाहीत आतापर्यंत ६,८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून ५०,००० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
US F-35C Shoots Down Iranian Drone Near Aircraft Carrier Amid Tensions
A US F-35C jet shot down an Iranian drone approaching the USS Abraham Lincoln. The incident occurred amid high-seas tension and upcoming nuclear talks between Trump and Pezeshkian.



























































