
इराण आणि इस्रायल-अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे जग दहशतीत आहे. जगभरामध्ये ऊर्जा संकट निर्माण झाल्याने हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र हा संघर्ष आता आणखी उग्र होण्याचे संकेत मिळत आहेत. इराणने होर्मझची सामुद्रधुनी बंद केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. ही सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेने तीन युद्धनौका आणि 2500 मरीन कमांडो होर्मुध सामुद्रधुनीकडे रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आगामी काळात रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.
अमेरिकेने सॅन दिएगो बंदरातून यूएसएस बॉक्सरसह तीन अजस्त्र युद्धनौका आणि 11 व्या मरीन एक्स्पेडिशनरी युनिटचे 2500 मरीन कमांडो मध्य पूर्वेकडे रवाना केले आहेत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिला आहे. या युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात केल्या जाणार असून त्यांच्या ठिकाणांबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंतची ही सर्वात मोठी लष्करी तैनात आहे. यामुळे आखातात युद्धाचा जोर वाढणार आहे.
पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याचा इशारा
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोजताबा खामेनी यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी संघर्ष आणखी चिघळवण्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे इराणचे लष्करी प्रवक्ते जनरल अबोलफजल शेकरची यांनी जगभरातील उद्याने, पर्यटन स्थळे आणि मनोरंजन केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तेल पेटले
दरम्यान, इराणने आखाती देशांतील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत. कुवेतच्या मिना अल-अहमदी रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यामुळे भीषण आग लागली. सौदी अरेबिया, बहरीन आणि दुबईवरही क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. या युद्धाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला असून युद्धापूर्वी 70 डॉलर प्रति बॅरल असलेले तेल आता 108 डॉलरवर पोहोचले आहे.


























































