
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’ची (CIA) नजर होती. त्यांच्या प्रत्येक हालचालीची माहिती अमेरिकेला मिळत होती. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे राबवलेल्या गोपनीय ऑपरेशनमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. अनेक महिन्यांपासून खामेनी यांच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकन यंत्रणांची नजर होती. त्यामुळे हे शक्य झाले. या कारवाईमुळे इराणच्या सत्तेला मोठा धक्का बसला असून संपूर्ण जगात खळबळ माजली आहे.
‘सीआयए’ने खामेनी आणि इराणच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या हालचालींचा सखोल अभ्यास केला होता. ते कोणाला भेटतात, कुठे राहतात आणि संकटाच्या वेळी कोणत्या बंकरचा आश्रय घेऊ शकतात, याची इत्यंभूत माहिती गोळा करण्यात आली होती. अमेरिकेने ही सर्व गुप्तचर माहिती इस्रायली यंत्रणांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे, खामेनी दिवसा स्वतःला अधिक सुरक्षित समजत असत, हीच बाब लक्षात घेऊन सुरुवातीला रात्री नियोजित असलेला हा हल्ला ऐन दिवसा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास, जेव्हा खामेनी आणि इराणचे इतर महत्त्वाचे लष्करी अधिकारी तेहरानमधील एका सुरक्षित संकुलात बैठकीसाठी जमले होते, तेव्हा इस्रायली लढाऊ विमानांनी अत्यंत अचूक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. अवघ्या 60 सेकंदात तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले. यामध्ये खामेनी यांच्यासह इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख आणि सुमारे 40 वरिष्ठ अधिकारी ठार झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
या ऑपरेशननंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली. “आमच्या प्रगत ट्रॅकिंग सिस्टिम आणि अचूक गुप्तचर माहितीपासून इराणचे नेते वाचू शकले नाहीत,” असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. जर या मोहिमेत सुरुवातीलाच सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य केले नसते, तर ते भूमिगत झाले असते, असा दावा लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला असून प्रतिहल्ल्यात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या संघर्षात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या युद्धामुळे आगामी काळ अधिक संघर्षाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

























































