अमेरिका-इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, आखाती देशांतील सर्वात उंच ‘बी-१’ पूल उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील युद्ध आता भीषण वळणावर पोहोचले असून, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई दलाने इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठा आघात केला आहे. गुरुवारी झालेल्या एका हवाई हल्ल्यात आखाती देशांतील सर्वात उंच मानला जाणारा इराणचा बी-१ (B-1 Bridge) पूल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे इराणची राजधानी तेहरानचा संपर्क तुटला असून संपूर्ण देशात वीज संकट गडद झाले आहे.

अल्बोर्झ प्रांतातील करज शहराजवळ असलेला हा बी-१ पूल इराणच्या आधुनिक इंजिनिअरिंगचा नमुना मानला जात होता. १०५० मीटर लांब आणि १५६ मीटर उंच असलेल्या या पुलाचे उद्घाटन नुकतेच २०२६ मध्ये झाले होते. तेहरानला उत्तरेकडील भागांशी आणि कॅस्पियन समुद्राशी जोडणारा हा सर्वात महत्त्वाचा दुवा होता. या पुलाच्या विद्ध्वंसामुळे इराणची रसद पुरवठा साखळी आणि लष्करी हालचालींना मोठा खिळ बसली आहे.

या हल्ल्यात पुलासोबतच त्या भागातील मुख्य वीज वाहिन्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे उत्तर इराणमधील अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून मोठा पॉवर क्रायसिस निर्माण झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पुलाचा मोठा हिस्सा कोसळल्याने त्यावरून प्रवास करणारी वाहनेही ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती व्यक्त होत आहे.