
आखाती देशांतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाले आहेत. अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्याने किंवा निर्बंध लादल्याने हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या विमानतळ प्राधिकरणाने (यूएई) जारी केलेल्या नव्या सूचनांनंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणांवरही मोठा परिणाम झाला आहे. एअरलाईन्सला 15 मार्च 2026 रोजी नियोजित अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे हिंदुस्थान आणि UAE दरम्यान प्रवास करणारे शेकडो प्रवासी विमानतळावर अडकले आहेत.
दुबई विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनेमुळे विमान उड्डाणे रद्द करण्यात आले असून दिल्ली-दुबई मार्गावर केवळ एकच परतीचे उड्डाण चालवणार असून अन्य नियोजित उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इंडिगोनेही रविवारी संयुक्त अरब अमिराती आणि दुबईला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. एअरलाइन्स शारजाह येथून दिल्ली, कन्नूर, कोची, कोझिकोड, मुंबई आणि तिरुवनंतपुरम येथे जाणारी उड्डाणे ऑपरेट करण्याच्या प्रयत्नात आहे.


























































