
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तिसऱ्या आठवड्यातही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. यामुळे जागतिक तेलपुरवठा विस्कळीत झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण मिळवल्यामुळे जगभरातील तेल आयात करणाऱ्या देशांची पर्यायी तेलपुरवठा मार्ग शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे. मात्र, या परिस्थितीचा रशियाच्या तेल उद्योगाला मोठा लाभ होताना दिसत आहे. 2022 मध्ये युक्रेनविरुद्ध युद्ध छेडल्यानंतर अमेरिकेने निर्बंध घातल्याने रशिया अडचणीत आला होता. मात्र आखाती देशांतील युद्ध रशियासाठी संजीवनी ठरत आहे.
‘फायनान्शियल टाइम्स’च्या अहवालानुसार, आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढल्या आहेत. यामुळे मॉस्कोच्या तिजोरीत दररोज 150 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त भर पडत आहे. दोन महिन्यांपूर्वी 52 डॉलर्स प्रति बॅरलने विकले जाणारे रशियाचे ‘युराल्स क्रूड’ (Urals crude) आता 70 ते 80 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहे. परिणामी इराण युद्धाच्या पहिल्या 12 दिवसांतच रशियाने तेलाच्या निर्यातीतून सुमारे 1.3 ते 1.9 अब्ज डॉलर्स इतका अतिरिक्त कर महसूल कमावला आहे.
इराणमधील संघर्ष शिगेला पोहचल्यानंतर हिंदुस्थान आणि चीन या सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांनी रशियाकडे आपला मोर्चा वळवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत हिंदुस्थान आणि चीन या दोन्ही देशांच्या रशियन तेल आयातीत सुमारे 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या हिंदुस्थान रशियाकडून दररोज सुमारे 15 लाख बॅरल तेलाची खरेदी करत आहे.



























































