
पाकिस्तानशी युद्धविरामावर अमेरिकेशी चर्चेच्या अनेक फेरी झाल्या, पण त्यात व्यापाराचा कोणताही मुद्दा नव्हता, असे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेने युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला. आमच्यात डील झालं. अणुयुद्ध नको, व्यापार वाढवू, असं मी म्हणालो आणि दोन्ही देशांच्या नेतृत्वाने ही डील मान्य करून युद्ध थांबवलं, असे ट्रम्प म्हणाले. दोन्ही नेतृत्वासोबत डील झालं, उद्या त्यांच्यात डिनरही होईल, असे विधानही ट्रम्प यांनी केले.
अमेरिका-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरमच्या व्यासपीठावरून बोलताना ट्रम्प म्हणाले, माझ्या सरकारने दोन देशांमधील युद्ध थांबवले. त्यासाठी व्यापाराचा पत्ता फेकला. व्यापारावर बोट ठेवत मी दोन्ही देशांपुढे प्रस्ताव ठेवला. अण्वस्त्रांचा मारा करण्याऐवजी ज्या उत्तम वस्तूंची निर्मिती दोन्ही देशांत होते त्याचा बिझनेस करू, असे मी सांगितले आणि त्यांनी ते मान्य केले.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पंतप्रधान शक्तिशाली आहेत. चांगले आणि स्मार्ट नेते आहेत. त्यांनी माझे डील मान्य करून युद्ध थांबवले, असेही ट्रम्प यांनी पुढे नमूद केले.