निवडणुकीपूर्वी बायडेन यांची मोठी घोषणा, अमेरिकन नागरिकांशी लग्न करणाऱयांना व्हिसा मिळणार

अमेरिकेत या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्याकडून मोठमोठय़ा घोषणा केल्या जात आहेत. 5 नोव्हेंबरला होणाऱया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकन नागरिकांशी लग्न केलेल्या आणि गेल्या 10 वर्षांपासून बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या 5 लाखांहून अधिक जीवनसाथींना व्हिसा देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. बायडेन यांच्या या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे अमेरिकन लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या पती-पत्नींनी अमेरिकन नागरिकत्व प्राप्त केले आहे. परंतु त्यांच्या जोडीदारास अद्याप अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले नाही अशा जोडप्यांना लाभ होणार आहे. या जोडप्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकणार आहे.

सावत्र मुलांनाही मिळणार लाभ

घोषणेनुसार, दस्तावेज नसलेले जोडीदार उन्हाळ्यानंतर अर्ज करण्यास सक्षम असतील. नवीन योजनेसाठी पात्र होण्यासाठी, पती किंवा पत्नींनी 10 वर्षे अमेरिकेमध्ये वास्तव्य केलेले असावे. 17 जूनपर्यंत यूएस नागरिकाशी लग्न कलेले असावे. कागदपत्रे नसलेल्या व अमेरिकी नागरिकांची सावत्र मुले असलेल्या 50,000 मुलांनाही याचा लाभ मिळेल, असेही बायडेन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.