
इराणवरील हल्ले अजूनही सुरू आहेत अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाचे नाव घेतले आहेत. क्युबा आमच्या सोबत करार करण्यास उत्सुक आहे आम्ही लवकरच करार करू किंवा काय करायचे ते करू, पण आधी इराणचा प्रश्न मार्गी लावू! असे म्हणत ट्रम्प यांनी जगाचे टेन्शन वाढवले आहे.
क्युबा आणि अमेरिकेतील संबंध तणावाचे आहेत. अनेक वर्ष राजकीय संघर्ष, विविध निर्बंध, स्थलातरितांचे प्रश्न आणि सुरक्षा यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. मात्र आता क्युबा अमेरिकेशी करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितल्याने गुंतवणूकदारांचे लक्षं दोन्ही देशातील बदलाकडे लागले आहे. एअर फोर्स वनवर पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
याआधी शुक्रवारी क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डियाझ-कॅनेल यांनी सांगितले की, त्यांचा देश काही दशकांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे, त्यामुळे आता अमेरिकेसोबत चर्चा सुरू केली आहे. या चर्चेचा उद्देश दोन्ही देशांमधील मतभेदांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढणे हा आहे, या चर्चेतून तोडगा निघेल आणि संघर्ष संपेल असे त्यांनी सांगितले’.
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी क्युबा संदर्भात काही विधाने केली होती. क्युबा कोसळण्याच्या मार्गावर आहे, अमेरिकेसोबत करार करण्यास उत्सुक आहे. क्युबावर मैत्रिपूर्ण ताबा घेऊ, पण कदाचित ते मैत्रिपूर्ण देखील नसेल असेही पुढे ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर क्युबा मधील तणाव वाढला आहे. ट्रम्प नक्की काय पाऊल उचलणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.



























































