अमेरिका कोरोना उपचारांसाठी टॅब्लेट तयार करणार

अमेरिकन सरकारने कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी लस उत्पादक औषधी कंपन्यांना 18 अब्ज डॉलर्स निधी दिला होता. त्यामुळे आता अमेरिकेकडे पाच लसी उपलब्ध असून, त्यांची विक्रमी वेळात निर्मिती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता बायडेन सरकार कोविड 19 च्या उपचारासाठी टॅब्लेट बनविण्याची तयारी करीत असून, यासाठी तब्बल तीन अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या टॅब्लेट कोरोनाच्या विषाणूला नष्ट करणार असल्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचणार आहेत.

न्युयॉर्क टाइम्स च्या माहीतीनुसार, अमेरिकन आरोग्य व मानवसेवा विभागाने (डीएचएचएस) कोविड-19 पिल्स प्रोग्राम जाहीर केला आहे. यासाठी काही औषधी कंपन्यांनी पुढाकार घेतला असून, त्याच्या ट्रायल्स लवकरात लवकर घेण्याचे काम सुरू केले आहे. जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षाच्या अखेरीस काही गोळ्या बाजारात येतील, असा दावा ‘डीएचएचएस’ केला आहे. या मोहिमेत फक्त कोरोनावरच नव्हे तर भविष्यातील संभाव्य रोगांवरील औषधांसाठी काम केले जाणार आहे. त्यासाठी ‘अँटीव्हायरल प्रोग्राम फॉर पेण्डॅमिक’ चालवला जात आहे.

इतर विषाणूंवरील उपचार शोधणार

अहवालानुसार, इन्फ्ल्युएन्झा, एचआयव्ही आणि हिपेटायटिससारख्या जीवघेण्या आजारांवरील औषधे किंवा गोळ्या तयार केल्या जातील. यावर आधीपासूनच संशोधन सुरू होते. परंतु, कोरोना येण्यापूर्वी इतर रोगांच्या गोळ्या तयार करण्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे हे काम आता ‘मिशन मोड’वर सुरू करण्यात आले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इनफेक्टिव्ह डिसीजचे संचालक अॅन्थनी फौसी म्हणाले की, अँटीव्हायरल गोळ्यांद्वारे covid-19 च्या रुग्णांवर उपचार करता येईल, अशी वेळ लवकर येवो. डॉक्टर फौसी पुढे म्हणाले की, एकेदिवशी सकाळी मी उठतो. मला वाटते की मला बरे वाटत नाही. गंधशक्ती आणि चव जाते. घशातही वेदना होतात. मग मी माझ्या डॉक्टरांना कॉल करतो आणि म्हणतो, मला कोविड आहे आणि मला औषध सांगा.

covid-19 सुरुवातीच्या काळात संशोधकांनी काही अँटीव्हायरस औषधांचा वापर केला. परंतु, त्यामुळे गंभीर रुग्णांवर चांगले परिणाम पाहायला मिळाले नाहीत. संशोधकांच्या मते ही औषधे कोरोनाच्या पहिल्या काही दिवसांत वापरली असती तर फायदेशीर ठरले असते. परंतु, यामध्ये फक्त रेमडेसिविर काही प्रमाणात यशस्वी झाले आहे. परंतु, त्याचा उपयोगदेखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे. मात्र, नोव्हेंबर 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या वापराबाबत काळजी घेण्यास सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या