
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात शनिवारी भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका ५० वर्षीय व्यक्तीने केवळ आईस्क्रीम विकण्यावरून झालेल्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा शिरच्छेद केला. या भयानक कृत्यानंतर आरोपीने मृतदेहाचे मुंडके जाळण्याचा प्रयत्न देखील केला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बबलू असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून नेहमीप्रमाणे शनिवारी आईस्क्रीम विकण्यासाठी आला होता. मात्र, स्थानिक रहिवासी असलेल्या शंकर यादव याने बबलूच्या तिथे आईस्क्रीम विकण्याला आक्षेप घेतला. दोघांमधील हा शाब्दिक वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात शंकर यादवने धारदार शस्त्राने बबलूवर हल्ला केला आणि जागीच त्याचा शिरच्छेद केला. हत्या केल्यानंतरही शंकर तेवढ्यावरच थांबला नाही त्याने बबलूचे कापलेले मुंडके जवळच असलेल्या आगीत टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलीस तपास आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बाराबंकीचे पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आरोपी शंकर यादव हा मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. आईस्क्रीम विकण्यासारख्या एका क्षुल्लक कारणावरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले’.





























































