
उत्तर प्रदेशातील मेरठ पोलिसांच्या चकमकीत मुलींचे लैंगीक शोषण करुन फरार असलेला आरोपी शहजाद उर्फ निक्कीचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहजादच्या मृत्यूनंतर त्याच्या पित्याने मी आता निश्चिंत झोपेन असे म्हणत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
सोमवारी सकाळी सरुरपुर परिसरातील जंगलात शहजाद लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शोधमोहीम राबवली. त्यावेळी शहजाद आणि पोलिसांत चकमक झाली. पोलिसांनी शहजाद उर्फ निक्कीवर गोळी झाडली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात निक्कीच्या छातीला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. शहजादवर 7 वर्षाच्या मुलीसह दोन मुलींचे लैंगीक शोषण केल्याचा आरोप होता. पाच वर्षांची शिक्षा भोगल्यानंतरही तो सुधारला नसल्याची माहिती एसएसपी विपिन ताडा यांनी दिली. नुकतीच त्याने एका पीडित मुलीच्या घरावर फायरिंग केली होती.
शहजादचे वडिल रईसउद्दीन आणि कुटुंबाला जेव्हा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलावले त्यावेळी त्याच्या वडिलांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. रईसउद्दीन म्हणाले, मी हा मृतदेह घेऊन जाणार नाही. संपूर्ण आयुष्य त्याने आम्हाला त्रास दिला. आज मी निश्चिंत झोपेन. तो वय़ाच्या 9व्या वर्षापासून अपराधी बनला. त्याला सुधारण्याचे सर्व प्रयत्न केले पण तो सुधारला नाही. पोलिसांनी दोनदा त्याला पकडले, पण तरीही तो सुधारला नाही. रईसउद्दीन पुढे म्हणाले की, मी आज आनंदी आहे. योगी आदित्यनाथ आणि पोलिसांचे खूप आभारी आहे, शहजादने लग्नानंतर 3 महिन्यातच बायकोला सोडले होते. आणि तो अल्पवयीन मुलांना त्रास द्यायचा. पुढे ते म्हणाला, असा हैवान जगण्यापैक्षा मेलेलाच बरा, मी आनंदी आहे. आज पाय पसरुन झोपेन.