नोएडामध्ये इलेक्ट्रिक मीटर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 26 कर्मचारी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील सेक्टर 4 मध्ये आज पहाटे एका इलेक्ट्रिक मीटर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. बी-40 कॅपिटल पॉवर सिस्टम लिमिटेड या तीन मजली इमारतीमध्ये सकाळी साडेपाचच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी रौद्र होती की, काही वेळातच संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरलेआणि हा धूर अनेक किलोमीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसत होता.

अपघात झाला त्या वेळी कारखान्यात रात्रीच्या शिफ्टमधील सुमारे 240 कर्मचारी काम करत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे कामगारांमध्ये एकच घबराट पसरली. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्यामुळे अनेक कामगार आतमध्ये अडकले होते. जीव वाचवण्याच्या धडपडीत सुमारे 26 कामगार होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 हून अधिक गाड्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने इमारतीच्या खिडक्या फोडून अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत माहिती देताना कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त राजीव नारायण मिश्रा यांनी सांगितले की, सध्या आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींना योग्य उपचार मिळवून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की त्यामागे इतर काही कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून संयुक्तपणे केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.