
एका व्यक्तीने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरी करून दोन्ही ठिकाणांहून पगार घेत सरकारला चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी आणि प्रतापगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जयप्रकाश सिंह असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने जन्माची अद्दल घडवली आहे. सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने जयप्रकाश सिंहला 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सत्रीख पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या नरौली गावचा रहिवासी असलेल्या जयप्रकाश सिंह याने एकाच मार्कशीट आणि कागदपत्रांच्या आधारे दोन वेगवेगळ्या सरकारी विभागांत नियुक्ती मिळवली होती. त्याने 26 डिसेंबर 1979 रोजी प्रतापगड जिल्ह्यातील आरोग्य विभागात ‘नॉन-मेडिकल असिस्टंट’ म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र, हे सत्य लपवून त्याने जून 1993 मध्ये बाराबंकी जिल्ह्यातील शिक्षण विभागात शिक्षक म्हणूनही नियुक्ती मिळवली.
सरकारी नियमांनुसार कोणतीही व्यक्ती एकाच वेळी दोन सरकारी पदांवर काम करू शकत नाही. मात्र, जयप्रकाशने तब्बल 17 वर्षे दोन्ही ठिकाणचा पगार आणि भत्ते नियमितपणे उचलले. सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकत हा प्रकार दीड दशकाहून अधिक काळ सुरू होता. त्या काळी रेकॉर्ड डिजिटल नसल्याचा फायदा आरोपीने घेतला.
2009 मध्ये प्रभात सिंह नावाच्या व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दाखल केली. माहिती अधिकारांतर्गत दोन्ही जिल्ह्यांतून कागदपत्रे मागवण्यात आली, तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. चौकशीत जयप्रकाश एकाच वेळी दोन जिल्ह्यांत कर्मचारी म्हणून नोंदणीकृत होता हे सिद्ध झाले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.
मुख्य न्यायदंडाधिकारी सुधा सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 7 वर्षांची कैद आणि 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, गेल्या 17 वर्षांत त्याने दोन्ही ठिकाणांहून घेतलेल्या पगाराची रक्कम सरकारी तिजोरीत पुन्हा जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

























































