
उत्तर प्रदेशाच्या बुलंदशहर येथील एका बारावीच्या विद्यार्थ्याने भल्याभल्या टेक एक्सपर्टला थक्क करणारी कामगिरी केली आहे. त्याने एआय रोबोट तयार केला आहे. हा रोबोट फक्त प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर गरज पडल्यास शिक्षकांचीही जागा घेऊ शकतो. आदित्य कुमार असे विद्यार्थ्याचे नाव असून तो शिवचरण इंटर कॉलेजमध्ये शिकतो. त्याने सोफी नावाचा एआय टीचर रोबोट बनवला आहे. सोफी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोफी विविध प्रश्नांची उत्तरे देताना दिसते. सोफी एलएलएम चिपसेटवर आधारित आहे. या तंत्रज्ञानाचा वापर रोबोटिक्स उत्पादक कंपन्या करतात.
सोफी रोबोट कसा तयार केला, यावर आदित्य कुमारने सांगितले की, ‘‘मी हा रोबोट बनवण्यासाठी एलएलएम चिपसेटचा वापर केला आहे. हीच चिप मोठ्या कंपन्या त्यांच्या रोबोट्समध्ये लावतात. सध्या सोफी फक्त बोलू शकते, पण आम्ही तिला लिहिण्यायोग्य बनवण्यावरही काम करत आहोत.’’
शिक्षकांची जागा घेऊ शकतो
आदित्य म्हणतो, ‘‘जर एखाद्या दिवशी शिक्षक गैरहजर असतील, तर हा रोबोट मुलांना शिकवू शकतो. हा एक ‘सब्सिटय़ूट टीचर’ म्हणून काम करेल. सध्या सोफी फक्त हिंदीत बोलते, पण आदित्य भविष्यात तिला बहुभाषिक (मल्टी-लँग्वेज सपोर्ट) बनवण्याची योजना आखत आहे.

























































