
देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा, वसतिगृह आणि स्वत:च्या घरामध्ये सुद्धा स्त्री सुरक्षित नाही. उत्तराखंडमध्ये असाच गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला असून शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
उत्तराखंडमधील हल्द्वानी भागात राहणाऱ्या इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेमध्ये शिक्षकाने विनयभंग केला आहे. शिक्षक पीडितेला वारंवार व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅटवर अश्लील मेसेज करत होता. तसेच शाळेमध्ये तो पीडित विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करत होता. त्यामुळे या सर्व प्रकाराला वैतागलेल्या पीडितेने अखेर सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. कुटुंबियांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकाची तक्रार केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो अॅक्ट आणि विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.