उत्तर काशीत ढगफुटी; गाव वाहून गेलं 10 जवानांसह 50 जण बेपत्ता

उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली येथे आज ढगफुटीचे संकट कोसळले. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढय़ामुळे अख्खे गाव वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीत 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जवानांसह 50 हून अधिक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. अवघ्या 34 सेकंदांत अनेक घरे आणि हॉटेल्स ढिगाऱ्याखाली गाडली गेली. लष्करासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

धराली हे गाव डेहराडूनपासून 218 किलोमीटर अंतरावर आहे. घटनेचे अनेक व्हिडीओ आणि पह्टो समोर आले आहेत. पुराचा लोंढा गावाकडे येताना दिसत होता. हतबल लोक आरडाओरडा करत होते. अनेक हॉटेलांमध्ये दगड, माती आणि चिखलाचा लोंढा शिरला. नदीकिनारी असलेली अनेक हॉटेल्स आणि घरे पुरात वाहून गेली. त्यामुळे संपूर्ण धराली बाजारपेठ उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस सुरू असून सर्व परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितले.

गंगोत्रीला पूर; प्रचंड वित्तहानी

अतिवृष्टीमुळे गंगोत्री नदीला पूर आला. या नदीकाठावर धराली हे गाव आहे. या गावात हाहाकार माजला आहे. अनेक घरे कोसळली असून 10 ते 12 जण ढिगाऱयाखाली गाडले गेले असण्याची शक्यता बचावलेल्या गावकऱ्यांनी व्यक्त केली. 20 ते 25 हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि होम स्टे वाहून गेल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडून सद्यस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्सवरून पोस्ट केली आहे. उत्तरकाशीतील धराली येथील दुर्घटनेत बाधित झालेल्या लोकांबद्दल मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून मी परिस्थितीची माहिती घेतली आहे, असे पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

  • हर्षिल येथील तेल घाट येथे उभारण्यात आलेला लष्कराचा हेलिपॅड पुरात वाहून गेला. त्यात अनेक जवान बेपत्ता झाल्याची भीती आहे. धराली येथे लष्कराचे 10 जवान आणि एक जेसीओ बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. एक अधिकारी जखमी आहे.