रुद्रप्रयागमध्ये आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळं भूस्खलन, 4 मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे येथे मध्यरात्रीच्या सुमारास भूस्खलन होऊन 4 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व नेपाळी नागरीक असून मजुरीचे काम करत होते. त्यांचे मृतदेह डीडीआरएफद्वारे रुद्रप्रयाग येथे आणले जात असल्याची माहिती बचाव पथकातील अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास रुद्रप्रयाग जवळील पाटा हेलिपॅड येथील खाट गदेरा भागामध्ये भूस्खलन होऊन चार जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. याची माहिती मिळताचज एसडीआरएफ आणि डीडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य वेगाने सुरू केले. मात्र मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणारा चिखल यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. या सर्व समस्यांचा सामना करत बचावपथकांनी बचावकार्य सुरुच ठेवले. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा जीव वाचू शकला नाही.

शुक्रवारी पहाटे ढिगाऱ्याखालून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. मयत नेपाळचे रहिवासी असून रुद्रप्रयाग येथे मजुरीचे काम करत होते. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

अनेक महामार्ग बंद

दरम्यान, उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे धुमशान सुरू आहे. पावसामुळे जीवितसह वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच नंदप्रयाग, छिनका, गुलाबकोटी, पागलनाला आणि कंचनाला येथे महामार्गावर चिखल साचल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. टिहरीमध्येही पावसामुळे 15 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.