उरण पोलीस ठाण्यात अपुरे पोलीस

राजकुमार भगत । न्हावा शेवा

औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने विकसित होणाऱ्या उरण पोलीस ठाण्यात सध्या पोलिसांचे अपुरे संख्याबळ असल्याने या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गहन बनला आहे. तरी या परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृह विभागाने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील नागरीक करीत आहेत.

मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उरण तालुक्याच औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, नागरीकरणामुळे या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उरण तालुक्यात प्रामुख्याने तीन पोलीस ठाणी आहेत. उरण पोलीस ठाणे, न्हावा-शेवा पोलीस ठाणे आणि मोरा सागरी पोलीस ठाणे. मात्र या तीन ठाण्यांपैकी उरण पोलीस ठाणे हे खूप महत्त्वाचे आहे या ठाण्याच्या हद्दीत अनेक गावे आणि मोठ्या औद्योगिक क्षेत्र मोडते. या ठाण्याच्या हद्दीत सतत विविध प्रकारचे गुन्हे अपघात आंदोलने होत असतात त्यामुळे या पोलीस ठाण्यावर नेहमी कामाचा ताण असतो त्यातच या ठाण्यात नेमणूक झालेल्या 89 कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी गैरहजर किंवा रजेवर असतात. त्यामुळे प्रत्यक्षात या प्राण्यांमध्ये 50 ते 60 कर्मचारी निमित कामावर असतात.

त्यात उरण मध्ये लवकरच येऊ घातलेली रेल्वे यामुळे भविष्यात या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनणार आहे. आज उरण पोलीस ठाण्यात १९९ कर्मचाऱ्याचे संख्या बळ मंजूर आहे. मात्र उरण तालुक्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवघे ८९ पोलीस कर्मचारी आज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एकंदरीत उरण पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असणारे ८९ पोलीस कर्मचारी रिक्त असणाऱ्या ११० पोलिसांच्या कार्याचा लेखाजोखा आपल्या खांद्यावर घेऊन उन्ह-पावसाचा मारा सहन करीत अहोरात्र उरण मध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

त्यामुळे उरण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा,शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत असून त्यांना संसार सुखाचा आनंद लुटण्यासाठी झगडावे लागत आहे. तरी औद्योगिकरणाचे, येथील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी गृहखात्याने उरण पोलीस ठाण्यात पोलिसांचे संख्या बळ वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. एन. कोल्हटकर यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, पूर्वीचे उरण आणि आताच उरण हे औद्योगिकरणाच्या वाढत्या विकासामुळे झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याला अधिकारी व कर्मचारी अशा प्रकारे एकूण १९९ संख्या बळ कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा मात्र आमच्याकडे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील सुरक्षिततेची जबाबदारी व्यवस्थित हाताळत असल्याचे सांगितले. पुरेसे पोलीस मिळाल्यास आम्ही आणखी व्यवस्थितपणे ही जबाबदारी पार पाडू असे सांगितले.