वैष्णोदेवी यात्रा 22 दिवसांनंतर सुरू, ‘जय माता दी’चा जयघोष पुन्हा दुमदुमणार

‘जय माता दी’ च्या जयघोषात जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर माता वैष्णोदेवी तिर्थयात्रा 22 दिवसांनी पुन्हा सुरू झाली आहे. 22 दिवसांपूर्वी झालेल्या भयावह भूस्खलनामुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती. यामध्ये 34 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता आणि 20 जण जखमी झाले होते. माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड (SMVDSB) ने आज (17 सप्टेंबर) सकाळी हवामान अनुकूल असल्यास यात्रा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे कटरा येथे तळ ठोकलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

26 ऑगस्टला झालेल्या भूस्खलनानंतर यात्रा थांबवण्यात आली होती. यापूर्वी 1970 मध्ये भूस्खलन झाले होते. या भूस्खलनामुळे यात्रा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. यात्रा मार्गाची साफसफाई आणि दुरुस्तीचे काम जलदगतीने करण्यात आले. श्राइन बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक आव्हानांना न जुमानता, मंडळाने यात्रा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी रात्रंदिवस काम केले.

यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी श्राइन बोर्डाने अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. संपूर्ण मार्गावर पाळत वाढवण्यात आली आहे आणि भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बोर्डाने हवामान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रतिकूल हवामानाच्या बाबतीत यात्रा तात्पुरती थांबवण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

स्थानिक प्रशासनाने यात्रेकरूंना मदत करण्यासाठी अतिरिक्त आरोग्य आणि आपत्कालीन सेवा देखील पुरवल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर असलेले माता वैष्णो देवीचे मंदिर जगभरातील लाखो भाविकांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धेचे केंद्र आहे.