बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱया पत्रकार महिलेचा मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विनयभंग केला. याप्रकरणी कल्याण न्यायालयाने म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. त्यानंतर अटक टाळण्यासाठी म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
मुलींवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी 20 ऑगस्टला नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले. त्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दै. ‘सकाळ’च्या पत्रकार महिलेला मिंधे गटाच्या वामन म्हात्रे यांनी, ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे अपमानास्पद, अर्वाच्य शब्द वापरले. याप्रकरणी महिला पत्रकाराने तक्रार केल्यानंतर 36 तासांनी पोलिसांनी म्हात्रे यांच्याविरुद्ध विनयभंग व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. अटक होण्याची शक्यता वाढल्याने म्हात्रे यांनी ऍड. विरेश पुरवंत व ऍड. ऋषिकेश काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणी मंगळवारी न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यापुढे सुनावणी होणार आहे.