‘वंदे भारत’नंतर लवकरच येणार ‘वंदे मेट्रो’!

वंदे भारत’ सेमी हायस्पीड ट्रेन यशस्वी ठरल्यानंतर रेल्वे आता लवकरच ‘वंदे मेट्रो’ ट्रेन विकसित करणार आहे. पुढील 2024-25मध्ये ही प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे 50-60 किलोमीटर अंतरावरील दोन शहरे या गाडीच्या माध्यमातून सहजपणे जोडता येणार आहेत. देशांतर्गत रेल्वे वाहतुकीचे जाळे विस्तारण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. वंदे भारतचा कमाल वेग 160 किलोमीटर आहे. त्यामुळे अडीचशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शहरांदरम्यान ही गाडी चालवावी लागते. मात्र कमी अंतरावरील शहरांदरम्यान ती चालवणे शक्य नाही. त्यामुळे वंदे भारतप्रमाणेच कमी क्षमतेची वंदे मेट्रो गाडी विकसित करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. या गाडीमुळे दोन जवळच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.