तफावत आढळल्याने बिले भरली नाहीत,सभागृहनेत्यांची विधान परिषदेत माहिती

सामना ऑनलाईन, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचे तब्बल 7 लाख 44 हजार 981 रुपयांचे पाणी बिल थकवल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांमधून प्रसारित झाल्या. परंतु, वर्षा बंगल्याची बिले थकवण्यात आलेली नाहीत. उलट पाण्याची देयके सप्टेंबर 2018 मध्येच भरण्यात आली होती. परंतु, आता काही जुनी पाणी बिले आणि मे 2019 मध्ये भरलेली पाणी बिले यामध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे बिले भरण्याची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी आज सभागृहात दिली.

मंत्र्यांच्या बंगल्यांची पाणी बिले भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महापालिका यांच्यात सातत्याने समन्वय असतो असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे लाखो रुपयांचे पाणी बिल थकल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकाराखाली उघड केल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांमधून प्रसारित झाल्या होत्या. त्यावर सभागृहनेत्यांनी आज स्पष्टीकरण दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची पाणीबिले सप्टेंबरमध्येच भरण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.