
>> वर्षा चोपडे
कुठल्याही शाळेचे किंवा कॉलेजचे हृदय म्हणजे ग्रंथालय असते. ज्याप्रमाणे निरोगी हृदय शरीराचे आरोग्य राखण्यास मदत करते, त्याचप्रमाणे ग्रंथालये आपल्या ज्ञानाद्वारे वाचकाचे मन सुदृढ आणि सुविचारी करण्याचे कार्य करते. समाजाला योग्य दिशा द्यायची असेल तर योग्य वाचनीय पुस्तके महत्त्वाची ठरतात. ग्रंथालय म्हणजे काय तर साहित्यिक, संगीतमय, कलात्मक किंवा संदर्भ साहित्य पुरवणारी पुस्तके, हस्तलिखिते, रेकॉर्डिंग, डिजिटल ग्रंथसाठा असलेले स्थान. आपल्या देशात अनेक ग्रंथालये आहेत आणि प्रत्येकाचा इतिहास वेगळा व ग्रंथसंपदा निराळी आहे. केरळ ही देवभूमी तिच्या अनोख्या सौंदर्यासाठी विश्वप्रसिद्ध आहे तशीच साहित्य, ग्रंथ यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे पुस्तकांचा खूप आदर आहे. केरळमध्ये फिरताना छोटय़ा हॉटेलमध्ये किंवा दुकानांमध्ये पुस्तके सहज विकत घेता येतात.
केरळमध्ये अनेक ग्रंथालये आहेत. कोचीमध्ये असलेल्या राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्स या प्रसिद्ध महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रत्येकाने बघावे असे आहे. हे ग्रंथालय बघण्यासाठी देशातून आणि विदेशातून अनेक ग्रंथप्रेमी येतात. या ग्रंथालयाचे नाव फादर मोसेस लायब्ररी असून हे नाव राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेसचे पहिले प्राचार्य रेव्हरंड फादर डॉ. अब्राहम मोसेस यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अत्यंत देखणे ग्रंथालय, विविध कॉलेज विषयाशी संबंधित विपुल ग्रंथसंपदा आणि आधुनिक टेक्नॉलॉजिचा वापर हे या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ आहे. भारतातील दुसऱया क्रमांकाचे समाजकार्य करणारे हे महाविद्यालय आंतररराष्ट्रीय जर्नलमध्ये विविध विषयांवर रिसर्च पेपर लिहिण्यावर आघाडीवर आहे. याचे सारे श्रेय ग्रंथालयाला व मॅनेजमेंटला जाते.
या ग्रंथालयाचा हरित ग्रंथालय हा उल्लेख यासाठी केला की, ग्रंथालयात अनेक विविध झाडे व नैसर्गिक गोष्टींचा स्रोत आहे. संपूर्ण कॉलेजमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला जातो. अत्यंत स्वच्छता हे या कॉलेजचे व ग्रंथालयाचे वैशिष्टय़ आहे. 1981 मध्ये शैक्षणिक समुदायांमध्ये ज्ञानाचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने कॉलेज लायब्ररीची स्थापना करण्यात आली. लायब्ररीमध्ये पुस्तके, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्स, मासिके आणि नियतकालिके, व्यावसायिक अभ्यास, पीएचडी थिसिस, प्रबंध, प्रकल्प अहवाल, वार्षिक अहवाल, परिषद कार्यवाही आणि बातम्यांचे दस्तऐवजीकरण इत्यादींचा मोठा संग्रह आहे. ऑनलाइन डेटाबेसने सुसज्ज असलेल्या ग्रंथालयात बाहेरील शिक्षण तज्ञ आणि संशोधन इच्छुकांसाठी संदर्भ सेवा दिली जाते.
ग्रंथालयातील प्रस्तावित वित्त संग्रहालयात मगध काळातील नाण्यांचा एक अद्भुत संग्रह आहे. शिवाय ख्रिस्त काळातील नाणी, प्राचीन ग्रीस, प्राचीन चेर, चोल आणि पांडय़ राजवंश, कोचीन राज्य, त्रावणकोर राज्य आणि ब्रिटिश भारत या काळातीलदेखील नाणी आहेत. तसेच संग्रहालयात वित्त, मोजमाप, गुलामगिरी, व्यापार आणि वाणिज्य यांच्याशी संबंधित कलाकृती आणि कागदपत्रे आहेत. लेखन उपकरणे आणि शाईची विहीर (कुंडी) आहेत. भूतकाळातील शिल्पे ही या ग्रंथालयाचे आकर्षण वाढवतात. पुस्तकं आणि ग्रंथालयं हे केरळचे वैशिष्टय़. त्यामुळे विपुल ग्रंथसंपदेच्या सान्निध्यात वेगळा आनंद घेता येतो.