वसंत कानेटकर हे नाट्य क्षेत्रातील स्कूल, ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांची भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसंत कानेटकर हे नाटय़ क्षेत्रातील केवळ नाव नसून ते एक ‘स्कूल’ आहे. कानेटकर मला गुरुस्थानी  होते आणि त्यांचा शिष्य म्हणवून घेण्यात मी कृतार्थता मानतो. कारण मी कानेटकरांच्या नाटय़धर्मी कुळातील आहे, अशी भावना ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांनी व्यक्त केली.

वसंत कानेटकर यांच्या रौप्य महोत्सवी स्मृती वर्षानिमित्त  आयोजित ‘वसंत स्मृती’ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सुरेश खरे बोलत होते. ‘कानेटकरांनी त्यांच्या नाटकांतून पिता-पुत्र नातेसंबंध ज्या पद्धत्तीने उलगडले आहेत त्याला तोड नाही. कानेटकरांच्या नाटकातील पिता-पुत्र नातेसंबध हा स्वतंत्र पीएचडीचा विषय होऊ शकतो. वसंत कानेटकरांची लेखणीवर प्रचंड निष्ठा होती. कानेटकरांच्या नाटकांची उजळणी होणे आवश्यक आहे. त्यांच्या नाटकांच्या अभिवाचनाचे प्रयोग होणे आवश्यक आहे’, असे खरे म्हणाले.

विजय केंकरे म्हणाले की, ‘शिवाजी महाराज ते बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित अशी कानेटकरांच्या नाटकाची व्याप्ती प्रचंड मोठी होती. वसंतरावांच्या नाटकांतून त्यांचा  विषयाचा अभ्यास दिसून येतो.’