वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा

प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले धडाडीचे शिवसैनिक वसंत तावडे यांच्या असामान्य योगदानाला अभिवादन करण्यासाठी या वर्षीपासून ‘साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये मराठी कथा लेखकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक ‘मार्मिक’तर्फे करण्यात आले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारणाच्या विचारांच्या प्रेरणेतून शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी प्रबोधन गोरेगाव या संस्थेची 1972 साली स्थापना केली. वसंत तावडे हे प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक धडाडीचे शिवसैनिक. या संस्थेचे ते एक प्रमुख आधारस्तंभ होते. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासाची व कार्याची विविध वृत्तपत्रांत आणि मासिकात छापून आलेली कात्रणे जमा करण्याचा त्यांना छंद होता.

उत्तम वाचक आणि चांगला लेखक हे गुण असल्यामुळे त्यांनी ‘आपले वसंतश्री’ हा दिवाळी अंक अनेक वर्षे यशस्वीपणे चालविला. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्याने व्याकरणशुद्ध मराठी लेखनासाठी त्यांचा प्रचंड आग्रह होता. 1977 साली मराठी साहित्य संमेलन गोरेगाव येथे भरवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई साहित्य संघ, गिरगाव या संस्थेशी आणि त्या संस्थेच्या कार्यात त्यांचा जवळचा संबंध होता तसेच ज्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जायचे त्या ठिकाणी ते आपल्या मित्र परिवाराला सोबत घेऊन जायचे.

या स्पर्धेसाठी किमान तीन हजार ते कमाल चार हजार शब्द मर्यादा असावी. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच प्रथम उत्तेजनार्थ, द्वितीय उत्तेजनार्थ व सर्वोत्पृष्ट विनोदी कथालेखनास प्रोत्साहन म्हणून विनोदी कथा पारितोषिक दिले जाईल. लेखकांनी आपली कथा प्रबोधन गोरेगाव, प्रबोधन क्रीडा भवन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई-104 या पत्त्यावर किंवा prabodhankridabhavan2014@ gmail.com या ई-मेलवर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवावी, असे आवाहन प्रबोधन गोरेगावने केले आहे.