
वसई-विरार पालघर क्षेत्रात राहणाऱ्या लांबपल्ल्याच्या प्रवाशांची चिंता आता मिटणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले वसईच्या रेल्वे टर्मिनसचे काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने टर्मिनस तयार करण्यासाठी आवश्यक असलेला संरचना आराखडा व अभियांत्रिकी आराखडा तयार करण्याच्या कामाला गती दिली असून रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे पालघर-ठाण्यातील लांबपल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास हा अधिक सोयीचा आणि सुखकर होणार आहे.
वसई-विरार शहराचे नागरीकरण वाढत असून या परिसरात परराज्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या नागरिकांना लांबपल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे, कुर्ला, दादर या ठिकणी गर्दी करावी लागते. या ठिकाणांवरून गाड्या पकडणे म्हणजे एक प्रकारचे आवाहनच असून सामानाचा बोझा, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची चांगलीच फरफट होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी टर्मिनस तयार करण्यात यावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने टर्मिनसच्या कामाची घोषणा केली. मात्र सहा वर्षे उलटूनही या कामाला गती मिळत नसल्याने प्रवाशांसह रेल्वे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही दिला होता. तसा पत्रव्यवहार सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगॉस यांनी रेल्वे प्रशासनाकडे केला होता.