‘वायू’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने, गुजरातचा धोका टळला, हाय ऍलर्ट कायम

125

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलली असून हे चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने सरकले आहे. गुजरातचा धोका टळला असला तरी गुजरातच्या किनारपट्टी भागात पुढील 48 तास ‘हाय ऍलर्ट’ राहणार आहे. येथील तीन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वादळ बुधवारी रात्रीच समुद्राच्या दिशेने परतले. मात्र, गुजरातच्या काही भागांत गुरुवारी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला.

सौराष्ट्र, कच्छ आणि केंद्रशासित दिवमध्ये ‘वायू’ वादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मात्र वादळाने बुधवारी रात्रीच दिशा बदलली. हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर न धडकता ओमानच्या दिशेने सरकले. मात्र, सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. तटरक्षक दल, लष्कर, नौदल, हवाई दलाबरोबरच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सही सतर्क आहे. वादळ 900 किमीच्या क्षेत्रात विस्तारले असून गुजरात किनारपट्टी भागात जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली.

500 गावांची बत्ती गूल

‘वायू’ वादळामुळे राज्यातील जवळपास 500 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊन अंधार पसरला. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या भागांतील वीजपुरवठय़ाला वादळाचा फटका बसला.

पश्चिम रेल्वेच्या 77 गाडय़ा रद्द

पश्चिम रेल्वेने 77 गाडय़ा रद्द केल्या, तर अन्य 33 गाडय़ांचा प्रवास कमी केला. रद्द केलेल्या गाडय़ांमध्ये वेरावल-अमरेली, अमरेली-जुनागढ, देलवडा-वेरावल यांचा समावेश आहे. मदतकार्यासाठी राजकोट विभागात दोन, तर भावनगरमध्ये एक विशेष ट्रेन चालवली जात आहे.

  • खबरदारीच्या उपाययोजना
  • मच्छीमारांना समुद्रात ‘नो एण्ट्री’
  • किनाऱ्यावर न जाण्याचे नागरिकांना आवाहन
  • शस्त्रधारी बल, तटरक्षक दलांच्या मदतीला नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची दहा, तर स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची नऊ पथके किनारपट्टी भागातील दहा जिह्यांत तैनात
  • कच्छ आणि सौराष्ट्र येथील विमानतळांवरील वाहतूक बंद
आपली प्रतिक्रिया द्या