ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन

नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे गुरुवारी रात्री माहीम येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर काल दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काही वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजलेल्या ‘प्रपंच’ मालिकेतही प्रेमा यांनी साकारलेली आजीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. ‘फनरल’ सिनेमातील त्यांची भूमिकाही गाजली.

 अभिनय आणि शिक्षण क्षेत्रांत प्रेमा साखरदांडे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ध्वनिमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत्या. बालपणापासून त्या कलेशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे यांनी अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. प्रेमाताई मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार आणि चंद्रशालाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. बालरंगभूमीसाठीही प्रेमाताईंनी मोठे योगदान दिले. बालरंगभूमीसाठी दिशादर्शक ठरणारी दोन पुस्तके त्यांनी लिहिली.