
मराठी अस्मितेला पंख देणाऱया, संवेदनशील विचार रुजवणाऱया ज्येष्ठ साहित्यिकांसह भाषा अभ्यासक, संवर्धकांचा चौथ्या विश्व मराठी संमेलनात सन्मान करण्यात आला. ‘ज्ञानपीठ’ विजेते भालचंद्र नेमाडे यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना, तर विशेष पुरस्कार शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांना प्रदान करण्यात आला.
केटीएचएम महाविद्यालयात कुसुमाग्रज नगरीत शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिनी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्कार; श्रीनिवास कुलकर्णी यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार, शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांना विशेष पुरस्कार मिळाला. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार विनोद कुलकर्णी यांना, अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दिलीप धोंडगे यांना प्रदान करण्यात आला. संस्थेसाठीचा भाषा संवर्धक पुरस्कार कर्नाटकातील कलबुर्गी येथील मसापच्या वतीने अध्यक्ष गुरेय्या स्वामी यांनी; तर अभ्यासक पुरस्कार इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरातर्फे सुषमा दातार यांनी स्वीकारला. श्री. पू. भागवत पुरस्काराने निर्मल प्रकाशन (नांदेड) चा गौरव करण्यात आला. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या साहित्य प्रकाशनासाठी पन्नास लाखांचा धनादेश निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
संवाद काैशल्यासाठी ‘लँग्वेज लॅब’
मुख्यमंत्रीपदाच्या मागील काळात मराठी अनिवार्य करूनही काही शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही, त्यासाठी त्या शाळा कुठल्यातरी बोर्डाच्या आहेत असे कारण दिले जाते, याची कबुलीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रात राहणाऱया प्रत्येकाला मराठी नीट बोलता-लिहिता यावी म्हणून शाळांमध्ये मराठी संवाद काैशल्य शिकवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून ‘लँग्वेज लॅब’चा प्रयोग केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मराठीचा विकास करू, असे ते म्हणाले. आचारसंहितेच्या शक्यतेमुळे यावर्षी हे संमेलन नाशिकला घेतले, पुढील वर्षी देशातच, त्यानंतर परदेशात घेऊ, असे सांगताना त्यांनी 2027चे संमेलन विदर्भातच घेण्याचे सूचवले.
मराठी ज्ञानभाषा व्हावी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सर्वांनी मिळून नव्या पिढीत आपली मराठी रुजवली पाहिजे. ती केवळ घरापुरती मर्यादित न राहता ज्ञानभाषा, उपजीविकेचीही भाषा व्हायला हवी, अशी भावना व्यक्त केली. मराठी जपूया, वाढवूया, जगाच्या कानाकोपऱयात पोहचवूया, हा संकल्प करण्याचे आवाहन केले. स्वर्गीय अजित पवार यांचे मराठीवर प्रेम होते, ती पोटा-पाण्याची भाषा व्हावी हा आग्रह होता, हे सांगताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली.
























































