
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर भूमिका साकारणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर 16 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता ‘मी जिंकून घेईन सारं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत भारती आचरेकर ‘बाई आजी’ या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
कधी कधी जोडलेली नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात. याच धाग्यावर आधारित असलेली ‘मी जिंकून घेईन सारं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत भारती आचरेकर यांच्यासह जान्हवी तांबट, अमृता फडके, वंदना वाकनीस, संचीत चौधरी, अमित रेखी आणि दिशा दानडे हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
बाई आजी आणि छवीचं अतूट नातं या मालिकेत उलगडणार आहे. कितीही संकटं आली तरी छवी ती खंबीरपणे कशी निभावून नेणार? शांभवीच्या सूडामागचं नेमकं कारण काय आहे? छवी राजगुरू कुटुंबाचं रक्षण करताना कोणती किंमत मोजणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.



























































