
बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणाऱ्या एका तरुणाने दादागिरी करीत मी पोलिसाचा मुलगा आहे, अशाप्रकारे दमबाजी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याने मध्यवर्ती नारायण पेठेतील वाहनांना धडक दिल्यामुळे संबंधिताने तरुणाला अडविले. मात्र, गाडीतून खाली उतरताच त्याने घटनास्थळी असलेल्यांना मी पोलिसांचा मुलगा आहे, मला मारले आहे अशापद्धतीने अरेरावीची भाषा केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त हृषिकेश रावले यांनी दिली.
भरधाव मोटार चालक तरुणाने बेदरकापणे वाहन चालवित रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा मध्यवर्ती नारायण पेठेत घडली. अपघातानंतर नागरिकांनी तरुणाला गाडीच्या खाली उतरवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो एका मैत्रिणीसोबत गाडीतून खाली उतरला. त्याने स्वतःला पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा धाक दाखवत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावरचा वाद वाढत गेला. त्यानंतर गर्दी झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. गोंधळामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. रस्त्यावर सुरू झालेल्या बाचाबाची आणि आवाजांच्या गोंगाटामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी मोटारीत चौघे असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये दोन तरूणींचा समावेश होता. संबंधित भरधाव मोटार चालकाने इतर वाहनांना धडक दिल्यानंतर वाद सुरू झाला. अपघातात सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.



























































