
इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबईहून कोलकाताला जाणाऱ्या विमानात शुक्रवारी धक्कादायक प्रसंग घडला. दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरुन बाचाबाची सुरु झाली. त्या बाचाबाचीमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशाच्या थेट कानाखाली थप्पड लगावली. इंडिगो एअरलाईन्सच्या 6E138 क्रमांकाच्या विमानात ही घटना घडल्याचे उघडकीस आले असून घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी अधिक तपास सुरु ठेवला आहे.
मुंबईहून गेलेल्या विमानाचे कोलकात्यात लँडिंग झाल्यानंतर थप्पड लगावणाऱ्या प्रवाशाला कोलकाता विमानतळावरील सुरक्षा पथकाकडे सोपवण्यात आले. त्या प्रवाशाला इंडिगो एअरलाइनने बेशिस्त प्रवासी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, इंडिगो एअरलाईन्सकडून मात्र अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
रागाच्या भरात सहप्रवाशाला थप्पड मारण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सोशल मीडियात थप्पड मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ क्लिपमध्ये सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने अचानक दुसऱ्या प्रवाशाला थप्पड मारल्याचे दिसत आहे. जोराची थप्पड बसल्याने तो प्रवासी रडू लागला. त्याला विमानातील क्रू मेंबर्सनी सुरक्षितस्थळी नेल्याचे व्हायरल व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे.