भाजपचे विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ पक्ष सोडून भाजपमध्ये जात असतानाच आता नागपूर जिह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची गळती काही केल्या थांबत नसताना विदर्भात मात्र उलटे चित्र पहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ध्वज फडकावणारे भाजपचे विजय घोडमारे यांनी आज मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. हिंगणा मतदारसंघ हा पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. 2009मध्ये घोडमारे यांनी हिंगण्यात भाजपचा झेंडा रोवला. असे असतानाही 2014च्या निवडणुकीत भाजपने त्यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या समीर मेघे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे घोडमारेंची नाराजी कायम राहिली. 2019च्या निवडणुकीतही घोडमारेंना भाजपकडून तिकीट मिळण्याचे कोणतेही संकेत नसल्याने ते राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता आहे.

हिंगणा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न

हिंगणामध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री हिंगण्याचे उमेदवार रमेश बंग यांनी हिंगण्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवले होते. परंतु 2009च्या विधानसभा निवडणुकीत घोडमारे यांनी त्यांचा पराभव केला. आता घोडमारे हिंगण्यातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी घोडमारे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांच्या भेटीत घोडमारेंनी तिकिटासाठी प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या