
इंग्लंडच्या कोर्टाने देश सोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हिंदुस्थानात कधी परतणार हे सांगता येणार नाही, असा दावा फरार विजय मल्ल्याने बुधवारी उच्च न्यायालयात केला.
आर्थिक घोटाळेबाज जाहीर करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला मल्ल्याने याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. मुख्य
न्यायाधीश श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. तुम्ही हिंदुस्थानात आलात तरच आम्ही सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने मल्ल्याला बजावले होते. त्यावर बुधवारी मल्ल्याच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी वरील माहिती सादर केली. इंग्लंड कोर्टाने मल्ल्याला त्यांचा देश सोडण्यास मनाई केली आहे. परिणामी न्यायालय त्याला हिंदुस्थानात परतण्यास सांगू शकत नाही. आरोपी हजर नसतानाही त्याच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तेव्हा मल्ल्याच्या याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी विनंती अॅड. देसाई यांनी केली. मल्ल्याच्या वतीने देण्यात आलेली ही सर्व माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश देत खंडपीठाने ही सुनावणी 11 मार्चपर्यंत तहपूब केली.
सबब देऊ नका
इंग्लंड कोर्टाने तुम्हाला देश सोडून जाण्यास मनाई केली आहे, असे सांगून तुम्ही हिंदुस्थानात परत येण्यास टाळाटाळ करत आहात. इंग्लंड कोर्टाच्या त्या आदेशाविरोधात तुम्ही तेथे अपील केले आहात की नाही हे स्पष्ट केले जात नाही. तुम्ही केवळ या आदेशाची सबब देत आहात, असे खडेबोल न्यायालयाने मल्ल्याला सुनावले.



























































