विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वित्त विभागाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वित्त विभागाने अनिश्चित आर्थित स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मिंधे सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून मुद्रांक शुल्क दरात वाढ करण्याचे ठरवले आहे.एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने लुटण्याचा हा कारभार असल्याची खरपूस टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत मुद्रांक शुल्क वाढच्या निर्णयावरून सरकारवर हल्ला चढवला. ‘आता लहान कामांसाठी लागणाऱ्या शपथपत्रासाठी सुद्धा कमीत कमी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क महाराष्ट्रातील नागरिकांना द्यावे लागणार आहे. एका हाताने देऊन, दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार महायुती सरकार करत आहे’, असे वडेट्टीवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले.
मतांसाठी लाडकी बहिण योजना आणली. योजनेच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. इतर योजनांना कट लावून ही जाहिरातीसाठी सरकारला पैसे अपुरे पडत आहे. म्हणूनच काय तर मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे. महागाई, वीज दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ… यात आणखी भर घालत आता 100-200 रुपयांमध्ये होणाऱ्या कामासाठी नागरिकांना 500 द्यावे लागणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
आता लहान कामांसाठी लागणाऱ्या शपथपत्रासाठी सुद्धा कमीत कमी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क महाराष्ट्रातील नागरिकांना द्यावे लागणार आहे.
एका हाताने देऊन, दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार महायुती सरकार करत आहे.
मतांसाठी लाडकी बहिण योजना आणली. योजनेच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च… pic.twitter.com/7Ummlbqo4m
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 3, 2024
100 रुपयांऐवजी 500 रुपये द्यावे लागणार
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या विक्री व्यवहार नोंदणीसाठी 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येत होते, ते आता 500 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास 12 प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी 100 ते 200 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येत होते, मात्र आता त्यासाठी किमान 500 रुपये दर आकारण्याचे ठरविण्यात आले आहे.